श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : जुन्या तक्रारीचा राग मनात धरून एका २२ वर्षीय महिलेच्या घरात कोयता घेऊन घुसत तिला व तिच्या कुटुंबीयांना धमकावत धक्काबुक्की करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरातील नेहरुनगर भागात घडली आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नेहरुनगर परिसरात राहणाऱ्या फिर्यादी महिला (वय २२) या रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घरी असताना आरोपी सुनील सोमनाथ औटी (वय २६, रा. स्वप्ननगरी, श्रीरामपूर) हा हातात कोयता घेऊन त्यांच्या घरात घुसला.“माझ्याविरोधात दिलेली तक्रार तात्काळ मागे घ्या,” असे म्हणत त्याने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
फिर्यादी व घरातील सदस्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने रागाच्या भरात फिर्यादीसह कुटुंबीयांना धक्काबुक्की केली. यावेळी आरोपीने फिर्यादीच्या साडीचा पदर ओढून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ७४ (विनयभंग), ११५(२) (इच्छापूर्वक दुखापत), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी), ३५२ तसेच ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम ३५(३) नुसार नोटीस बजावण्यात आली असून, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पोना आढांगळे पुढील तपास करत आहेत.
श्रीरामपूरमध्ये तक्रार मागे घेण्यासाठी २२ वर्षीय महिलेचा घरात घुसून विनयभंग, धक्काबुक्की व विनयभंग प्रकरणी तरुणावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0Share
Leave a reply












