प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील चिंचोली शिवारात असलेल्या नंदादिप लॉजिंग येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत हॉटेल मॅनेजरला अटक करण्यात आली असून एका महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
दि. २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर श्री. सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नंदादिप लॉजिंग येथे आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करून कुंटणखाना चालवला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकास कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.
नमूद पथकाने राहुरी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती दिली. त्यानंतर पंच व पोलीस अधिकारी–अंमलदार यांना सोबत घेऊन नंदादिप लॉजिंग, चिंचोली शिवार येथे छापा टाकण्यात आला. छाप्यापूर्वी खात्री करण्यासाठी एका खाजगी इसमास बनावट ग्राहक म्हणून लॉजिंगमध्ये पाठविण्यात आले.छाप्यादरम्यान हॉटेलच्या काऊंटरवर असलेला इसम अमोल रामचरण अहिरवार (वय २९, रा. नंदादिप, चिंचोली ता. राहुरी, मुळ रा. खजरी, दमोह, मध्यप्रदेश) याने स्वतः हॉटेल मॅनेजर असल्याचे सांगितले. हॉटेल मालकाचे नाव सांगण्यास त्याने नकार दिला. लॉजिंगची पाहणी केली असता वरच्या मजल्यावरील खोली क्रमांक १०४ मध्ये एक महिला आढळून आली.
महिलेच्या चौकशीत ती पश्चिम बंगाल राज्यातील असून, हॉटेलचे मालक व मॅनेजर देहव्यापार करून ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यातील काही रक्कम देत असल्याची माहिती तिने दिली. या कारवाईत सदर महिलेची पोलिसांनी सुटका केली.
या प्रकरणी हॉटेल मॅनेजर अमोल अहिरवार व अज्ञात हॉटेल मालक यांच्याविरोधात राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५५/२०२६ अन्वये स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा १९५६ चे कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे करीत आहेत.सदरची कारवाई ही मा.श्री. सोमनाथ घार्गे साो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय ठेंगे, सपोनि सुदाम शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पोसई/ चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोंढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. सतिष पठारे, पो.कॉ. सहदेव चव्हाण तसेच राहुरी पो.स्टे.चे पोहेकॉ एस.बी. आवारे, मपोकॉ वंदना पवार यांनी केली आहे.
राहुरीतील ‘नंदादीप लॉजिंगवर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा, हॉटेल नंदादिपमधुन पश्चिम बंगाल येथील पीडित महिलेची सुटका ; मॅनेजर अटकेत

0Share
Leave a reply












