राहुरी प्रतिनिधी : यंदाच्या जोरदार पावसामुळे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र राहुरी, पाथर्डी आणि अहिल्यानगर तालुक्यातील अवकाळी प्रवाह व पाझर तलावांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप वांबोरी चारिचे पाणी मिळालेले नाही. परिणामी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून, चारिचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.
वांबोरी चारिच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांमध्ये भात, ऊस तसेच कडधान्ये व चारा पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. या पिकांना सध्या तातडीने पाण्याची गरज असताना आवर्तन सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. चारिचे आवर्तन सुरू झाल्यास या पाण्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना होऊन पिकांना जीवदान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अहिल्यानगर येथील मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत सर्व बाबींचा विचार करून वांबोरी चारिचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. वेळेत निर्णय न झाल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, प्रशासनाने त्वरित हालचाली करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
मुळा धरण भरूनही शेतकऱ्यांना पाणी नाही; वांबोरी चारिचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी

0Share
Leave a reply












