प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : कोल्हार कडीत शिवरस्त्यालगत बुधवारी (दि. २१ जानेवारी) सकाळी सुमारे सहा वाजता एक मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य अमोल खर्डे यांच्या वस्तीशेजारील रमेश खर्डे यांच्या शेतात तीन ते चार दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात ही बिबट्या अडकली. सदर बिबट्या सुमारे ८ ते १० वर्षे वयाची मादी असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
मागील एक महिन्यापासून कोल्हार कडीत परिसरात या बिबट्या मादीने धुमाकूळ घातला होता. अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या व वासरांवर हल्ले करून मोठे नुकसान केले होते. पाण्याच्या सिंचनासाठी रात्री-बेरात्री शेतात जावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. अनेक नागरिकांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शनही झाले होते.या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी रमेश खर्डे यांच्या शेतात वनविभागाच्या सहकार्याने पिंजरा लावण्यात आला होता. पिंजऱ्यात आमिष म्हणून शेळी ठेवण्यात आली होती. बुधवारी सकाळी ही मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
बिबट्या जेरबंद झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य अमोल खर्डे यांनी तात्काळ वनाधिकारी प्रतीक गजेवार तसेच रेस्क्यू टीमचे अनिल जाधव यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पिंजऱ्यात बिबट्या अडकल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला असून शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान, अद्यापही परिसरात आणखी एक-दोन बिबटे असण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून, आणखी पिंजरे लावण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे. यापुढील काळात नागरिकांनी सतर्क राहावे, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, तसेच स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन वनाधिकारी प्रतीक गजेवार यांनी केले आहे.
यावेळी कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील खर्डे, अनिल खर्डे, प्रदीप खर्डे, दिनेश खर्डे, अजिंक्य भगत, वैभव हारदे, पांडुरंग शिंदे, चिमा वडीतके यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
Leave a reply













