विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर / वसंत रांधवण : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि शिरूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने शिरूर शहरात केलेल्या कारवाईत १ किलोहून अधिक मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थासह एका गॅरेज चालकाला अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून, अटक करण्यात आलेल्या आरोपीचा अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याशी निकट संबंध असल्याची गंभीर बाब तपासात उघड झाली आहे. त्यामुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधात कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिले होते. त्यानुसार १७ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
या माहितीनुसार शिरूर शहरातील डंबेनाला बाबूरावनगर परिसरात राहणारा गॅरेज चालक शादाब रियाज शेख (वय ४१) हा बाबूरावनगर येथील मोकळ्या मैदानात एमडी विक्रीसाठी येणार असल्याचे समोर आले. उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग यांची परवानगी घेऊन १८ जानेवारी रोजी मध्यरात्री छापा टाकण्यात आला.या छाप्यात आरोपीच्या ताब्यातून १ किलो ५२ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एमडी) तसेच एक दुचाकी असा एकूण सुमारे २ कोटी १० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तपासादरम्यान अत्यंत गंभीर बाब उघड झाली असून, अटक करण्यात आलेल्या शादाब शेखचा अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील शाम गुजर या पोलीस कर्मचाऱ्याशी थेट संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर कर्मचारी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असल्याची माहिती आहे. पुणे ग्रामीण एलसीबी पथकाने मंगळवारी (दि. २०) सायंकाळी त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
ड्रग्ज तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात पोलीस दलातीलच कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने अहिल्यानगर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याची भूमिका, आरोपीशी असलेले आर्थिक व्यवहार, संपर्कातील साखळी तसेच ड्रग्ज नेटवर्कमधील संभाव्य सहभाग याबाबत सखोल तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी नगर पोलीस दल व स्थानिक गुन्हे शाखेतील कथित हप्तेखोरी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातून दरमहा २७ कोटी ६० लाख रुपयांचा हप्ता वसूल केला जात असल्याचा गंभीर आरोप जाहीरपणे केला होता.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या कारभाराविरोधात बेमुदत उपोषणामुळे हा मुद्दा चर्चेत आला असतानाच, आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणाऱ्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग उघड झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या या विषारी विळख्यात जर रक्षकच सामील असतील, तर न्याय कुणाकडे मागायचा? असा सवाल उपस्थित होत आहे.
अहिल्यानगरमधील पोलीस कर्मचाऱ्याला पुणे ग्रामीण एलसीबी पथकाने घेतले ताब्यात १० किलो ड्रग्जची परस्पर विक्री, पुणे-नगर अंमली पदार्थ साखळीचा सूत्रधार अटकेत

0Share
Leave a reply











