SR 24 NEWS

सामाजिक

आता ओबीसी समाजही राजधानी मुंबईत धडकणार !, दसऱ्यानंतर निघणार महामोर्चा; हालचालींना वेग 

Spread the love

विशेष प्रतिनिधी (वसंत रांधवण ) : काही दिवसापूर्वी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत दाखल झाला होता. ऐन गणेशोत्सवात मुंबईत मोर्चा झाला. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. राज्य शासनाने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयात कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, अशी चिंता ओबीसी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर या जीआरला ओबीसी समाजाकडून विरोध सुरू झाला आहे. दरम्यान, आता लवकरचओबीसी समाजाकडून मुंबईत मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दसऱ्यानंतर ओबीसी समाजाकडून मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा ८ किंवा ९ ऑक्टोंबर रोजी निघणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत ओबीसी नेत्यांच्या बैठका झाल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. या मोर्चाबाबत अंतिम निर्णय आज बैठकीत होणार आहे. मंत्री छगन भुजबळ आज या बैठकीत ऑनलाइन उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. आरक्षणाबाबत ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!