राहुरी प्रतिनिधी ( सोमनाथ वाघ) : मुळा धरण परिसरात आज (ता.११ सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. श्रीरामपूर तालुक्यातील शुभम लक्ष्मण घोडके (वय २४, रा. सूतगिरणी सम्राट नगर, श्रीरामपूर) या तरुणाचा मृतदेह पाण्यात आढळून आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शुभम घोडके आपल्या चार मित्रांसह राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरात एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास मरीआई खाईजवळील धरणाच्या कडेला वाढदिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर शुभम हा थर्माकोलच्या तराफ्यावर बसून पाण्यात गेला. मात्र, अचानक तो तराफा उलटल्याने शुभम पाण्यात बुडाला.
घटनास्थळी उपस्थित मित्रांनी व मत्स्य प्रकल्पातील तरुणांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रयत्नानंतर शुभमला पाण्याबाहेर काढून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण क्षीरसागर यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.शुभम हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सानप यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुळा धरण परिसरात मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

0Share
Leave a reply












