SR 24 NEWS

इतर

नगर-मनमाड रोडवरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर भाजप राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कदम यांचा पदाचा राजीनामा

Spread the love

(राहुरी फॅक्टरी) १२ सप्टेंबर : नगर-मनमाड महामार्गावर सातत्याने होत असलेल्या भीषण अपघातांमुळे परिसरात तीव्र असंतोषाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कुंडलिक कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राजकारणातील दुर्लक्ष आणि असंवेदनशीलतेविरोधात थेट बंड पुकारले आहे. त्यांनी आपला राजीनामा माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याकडे सुपूर्द केला असून, या निर्णयामुळे तालुक्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

श्री. कदम यांनी आपल्या राजीनामा पत्रात तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत म्हटले आहे की, “गेल्या काही वर्षांपासून नगर-मनमाड रोडवरील दुरावस्था नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. केवळ मागील दहा दिवसांत सात ते आठ निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. तरीदेखील जबाबदार लोकप्रतिनिधी या प्रश्नावर मौन बाळगत आहेत. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या असंवेदनशीलतेमुळे मला मनस्वी वेदना होत आहेत.”

ते पुढे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी सामाजिक कार्याची गती वाढवावी या उद्देशाने मी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून रस्त्याच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्याऐवजी टाळाटाळ होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. “नगर-मनमाड रोड दुरुस्ती कृती समितीमार्फत आम्ही व माझे सहकारी रस्त्याच्या प्रश्नावर प्रामाणिक लढा देत आहोत. पण सत्याला उजेडात आणण्याऐवजी आमच्यावर उलट खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, ही गोष्ट लोकशाहीला लज्जास्पद आहे.”

कदम यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे की, लोकप्रतिनिधींनी जनतेच्या जिवनमरणाच्या प्रश्नांवर प्रामाणिक भूमिका घेतली पाहिजे, मात्र तसे न झाल्याने या किळसवाण्या राजकारणाचा तिटकारा वाटतो. परिणामी पक्षात कार्यरत राहण्याची इच्छा उरलेली नसल्याने शहराध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कदम यांच्या या पावलामुळे भाजपच्या स्थानिक पातळीवर मोठा धक्का बसला आहे. नगर-मनमाड रोडच्या दुरुस्तीचा प्रश्न आता आणखी गाजण्याची चिन्हे आहेत. स्थानिक नागरिक मात्र कदम यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!