SR 24 NEWS

अपघात

नगर–मनमाड महामार्गावर दुहेरी अपघात; ह.भ.प. शशिकांत महाराज दुधाडे यांचा मृत्यू, एक जण जखमी

Spread the love

राहुरी प्रतिनिधी ( सोमनाथ वाघ ) : अहिल्यानगर–मनमाड महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून आज दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी दोन वेगवेगळे अपघात घडले. यात एक दुर्दैवी मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.पहिला अपघात सकाळी साधारण आठ वाजेच्या सुमारास गणेश शिंगणापूर फाटा परिसरातील धर्मडी गेस्ट हाऊसजवळ घडला. या ठिकाणी दुचाकी घसरल्याने राहुरी येथील ह.भ.प. शशिकांत महाराज दुधाडे यांचा जागीच मृत्यू झाला. शशिकांत  दुधाडे हे राहुरी येथील वेलनेस कोच संकेत दुधाडे यांचे वडील होते त्यांच्या निधनाने राहुरी शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अपघात ठिकाणी धाव घेण्यासाठी येत असलेल्या राहुरी खुर्द येथील ऋतिक गोल्हार या तरुणाचा देखील दुचाकी अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला असून तातडीने त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या दुहेरी अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. यावेळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पो. हे/कॉ. बापू फुलमाळी तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा पर्यवेक्षक बाळासाहेब हाळनोर, गोरक्षनाथ भालेराव, रवी बर्डे, कल्याण मेटे, राहुल पवार, अंकुश दळवी यांच्यासह सुरक्षारक्षक करण राठोड, श्रीकांत राऊत, गणेश बर्डे, अनिल नजन, रविराज काळे आदींनी अथक परिश्रम घेऊन वाहतूक सुरळीत केली.

या दोन अपघातांमुळे पुन्हा एकदा नगर–मनमाड महामार्गाच्या असुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी या मार्गावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!