SR 24 NEWS

सामाजिक

राहुरीचे सुपुत्र व नक्षल विरोधी अभियानाचे साहाय्यक आयुक्त संदीप भांड राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे  : गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात गेल्या दहा वर्षांपासून निष्ठेने कर्तव्य बजावणारे आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून परिचित असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप रमेश भांड यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहे. मुंबई येथील राजभवनात गुरुवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते एका भव्य कार्यक्रमात त्यांना हे पदक बहाल करण्यात आले. सध्या राज्य गुप्तवार्ता विभागात नक्षलविरोधी अभियानात कार्यरत असलेले संदीप भांड यांनी २०१६ पासून गडचिरोली जिल्ह्यात स्वेच्छेने सेवा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी एकूण ९ नक्षलवाद्यांचा खातमा केला आहे. तसेच विविध कारवायांमध्ये जिवंत स्फोटकांसह नक्षल डेनचे सहा वेळा उघडकीस आणले असून, दोन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, चार वेळा दारूगोळा हस्तगत करण्यात आला, आणि दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

संदीप भांड यांच्या शौर्याची व सेवाभावी कार्याची दखल घेत याआधीही केंद्र व राज्य शासनाकडून त्यांना विविध मान-सन्मान प्राप्त झाले आहेत. यात केंद्र सरकारचे पोलीस शौर्य पदक, आंतरिक सुरक्षा सेवा पदक, केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त मेडल, तसेच राज्य सरकारकडून स्पेशल फोर्स मेडल, विशेष सेवा पदक व पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह यांचा समावेश आहे तसेच त्यानां 7 जून रोजी गरुड फाउंडेशच्या वतीने ही राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

फक्त नक्षलविरोधी कारवायाच नव्हे, तर सामाजिक भान ठेवत भांड यांनी कोरोना काळात भामरागड येथे स्वतःच्या पगारातून गरीबांना दिवाळीत जेवण पुरवले. त्यांचे हे सामाजिक कार्य गृहमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेषत्वाने गौरवले.तसेच, त्यांनी भामरागड परिसरातील २५ तरुणांना सिक्युरिटी गार्ड म्हणून तेलंगणामध्ये नोकरी मिळवून देत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.

महाराष्ट्र पोलिसांच्या फोर्स वन या टेररिस्ट शूटर टीममध्ये त्यांनी काम केले असून, मुंबई क्राईम ब्रँचमधील सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्येही त्यांनी अनेक गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांनी पाच राष्ट्रीय कमांडो प्रशिक्षणासह एकूण ३० हून अधिक विशेष प्रशिक्षण पूर्ण केली आहेत. साहाय्यक आयुक्त संदीप भांड हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बांबोरी गावचे सुपुत्र असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला अभिमान वाटत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!