तुळजापूर प्रतिनिधी (चंद्रकांत हगलगुडे) दि. ८ सप्टेंबर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आयोजित युवा महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ झाला. महोत्सवाचे उद्घाटन मुख्य रस्त्यावरून काढलेल्या भव्य शोभायात्रेने करण्यात आले. या शोभायात्रेत विविध सांस्कृतिक झांक्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
गावातील नागरिक, महिला, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने गावात उत्सवी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. ताल, ढोल, ताशा, लेझीम यांच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत अणदूरकर मंत्रमुग्ध झाले.यंदा प्रथमच जवाहर महाविद्यालयाला विद्यापीठाचा युवा महोत्सव आयोजित करण्याची संधी मिळाल्याने ग्रामस्थांत व विशेषतः तरुणाईत मोठा आनंद व्यक्त होत आहे. या निमित्ताने अणदूर गावाने सांस्कृतिक व शैक्षणिक परंपरेचा ठसा उमटवला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे या यशस्वी आयोजनाबद्दल गावकऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. युवा महोत्सवाच्या पुढील दिवसांत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, त्याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
Leave a reply














