नांदेड प्रतिनिधी /धम्मदिप भद्रे : नांदेड शहरासह बिलोली, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, धर्माबाद, उमरी, भोकर, नायगाव , अर्धापुर आदी तालुक्यातील अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाची दखल घेत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी कृषिमंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांची विशेष भेट घेऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे तसेच पिकविमा रक्कम तत्काळ मंजूर करून देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली.
बिलोली व देगलूर तालुक्यातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग , ज्वारी , उडीद, हळद आदी पिकांवर अतिवृष्टीच्या पुरामुळे संकट आले आहे. हजारो एकर शेती उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांवर कर्जफेड, घरखर्च, मुलांचे शिक्षण यांसह आयुष्यभराची घडी विस्कटण्याची वेळ आली आहे. शेतकरी डबघाईला पोहोचू नयेत यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले त्वरित उचलावीत, अशी तळमळीची भूमिका डॉ. गोपछडे यांनी कृषिमंत्र्यांसमोर मांडली. जिल्ह्यातील अकरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी आणि नागरिक हैराण झाले आहेत . त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे सरसकट पंचनामे करून त्यांना सरसकट पीक विमा मंजूर करावा , याशिवाय शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा करून प्रत्येक शेतकऱ्यास तातडीने आर्थिक साह्य करावे.
अतिवृष्टीमुळे ज्यांची घरे पडली आहेत अथवा ज्यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे अशा नागरिकांना घरपडीच्या स्वरूपातून तातडीची आर्थिक मदत करावी आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नागरिकांना सावरण्यासाठी बळ द्यावे अशी विनंती त्यांनी यावेळी कृषीमंत्र्यांना केली आहे
या बाबींकडे केंद्रीय कृषिमंत्र्यांचे वेधले लक्ष
खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची दिल्लीत भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीकडे त्यांचे लक्ष वेधले. नांदेड जिल्ह्यातील 11 तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे जवळ जवळ सव्वा लाखाहून अधिक नागरिक अतिवृष्टीने बाधित झाले आहेत . 250 गावांना पुरामुळे मोठा तडाखा बसला आहे . दीड हजारहून अधिक पशुंचा मृत्यू झाला असून 2 लाखापेक्षा जास्त हेक्टरवरील पिके वाहून खरडून गेली आहेत. त्यामुळे अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या नांदेड जिल्ह्याला पुन्हा सावरण्यासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी खा. डॉ . गोपछडे यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केली.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज द्या : खा. डॉ. अजित गोपछडे यांची कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे आग्रही मागणी

0Share
Leave a reply












