SR 24 NEWS

इतर

राहुरी कृषी विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वाराजवळ चालत्या ट्रकला पेट – सुरक्षा यंत्रणेच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

Spread the love

राहुरी विद्यापीठ (आर. आर. जाधव) – राहुरी कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सोमवारी (दि. ८ सप्टेंबर २०२५) सकाळी सुमारे दहा वाजता एका चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. विद्यापीठाच्या सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ आणि समन्वयात्मक कामगिरीमुळे ही आग आटोक्यात आणली गेली आणि मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील (क्र. आर.जे. १४ जी ५०२३) हा ट्रक पंजाबहून बटाट्यांचा माल घेऊन बेंगळुरूकडे जात होता. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच ट्रकच्या उजव्या बाजूच्या टायरला अचानक पेट लागला. या दरम्यान प्रवेशद्वारावर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणारे सुरक्षा रक्षक अनिल नजन यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तातडीने विद्यापीठाच्या सुरक्षा कार्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी तत्काळ चार फायर इस्टिग्युशन सिलेंडरसह घटनास्थळी धाव घेतली आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी सुरक्षा पर्यवेक्षक गोरक्षनाथ भालेराव, रवी येनारे, राहुल पवार तसेच सुरक्षा रक्षक कल्याण मेटे आणि अक्षय येनारे यांनीही जीव धोक्यात घालून मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात आली.

घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अन्यथा ट्रकमध्ये भरलेला माल व आसपासचा परिसर धोक्यात येऊन मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. विद्यापीठ प्रशासन व परिसरातील नागरिकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तात्परतेचे कौतुक केले असून त्यांच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अपघात टळल्याचे सर्वत्र गौरविले जात आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!