राहुरी (प्रतिनिधी) : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत विना नंबर प्लेट दुचाकी वापरणाऱ्यांवर कारवाई करत आज (दि. २६ ऑगस्ट २०२५) पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल ३७ दुचाकी वाहने विना नंबर प्लेट आढळून आली. त्यांच्यावर मिळून २७,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, संबंधित मालकांना ताब्यात नंबर प्लेट बसवून देण्यात आल्या. पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की, चोरीच्या किंवा अल्प दरात विकल्या जाणाऱ्या अनेक दुचाकी गाड्या या परिसरात विना नंबर प्लेट वापरल्या जात आहेत. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई हाती घेतली.
या मोहिमेबाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले की, “वाहनावर योग्य नंबर प्लेट असल्यास चोरीचे वाहन शोधणे सोपे होते. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या वाहनावर पुढील व मागील नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई टाळता येणार नाही. मोहिमेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले. माननीय पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. पथकात पोसई आहेर, पोहेकॉ. संतोष ठोंबरे, पो.हे.कॉ. दरेकर, पो.शि. अमोल भांड, आजिनाथ पाखरे, सचिन ताजणे तसेच होमगार्ड कर्मचारी सहभागी होते.
पोलिसांनी यावेळी शोरूममधून नवीन वाहने विना नंबर प्लेट रस्त्यावर आणली जात असल्याचेही निदर्शनास आणले. अशा शोरूमविरुद्ध आरटीओमार्फत कारवाईसाठी पत्र पाठवले जाणार आहे. तसेच पालकांना आवाहन करण्यात आले की, आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा चारचाकी चालवण्यास देऊ नये. अल्पवयीन मुलगा वा मुलगी वाहन चालवताना आढळल्यास पालकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
राहुरी पोलिसांची विना नंबर प्लेट वाहनांवर धडक मोहीम – ३७ दुचाकींवर कारवाई, २७ हजार रुपये दंड

0Share
Leave a reply












