राहुरी (प्रतिनिधी) / जावेद शेख : नगर-मनमाड महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा ठरत असून, अपघातांच्या मालिकेला आळा बसत नाही. गेल्या आठ दिवसांत घडलेल्या चार भीषण अपघातांमध्ये चार जणांचा करुण अंत झाला आहे. याच मालिकेत बुधवारी (दि. ३ सप्टेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास राहुरी खुर्द येथे झालेल्या अपघातात सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश दत्तू साबळे (वय ६८, रा. राहुरी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत मोटारसायकलवर प्रवास करणारे राहुरी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. रामनाथ डोके हे सुदैवाने बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
सायंकाळी फेरफटका मारून घरी परतत असताना साबळे आणि डोके मोटारसायकलवरून जात होते. यावेळी नगरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले. मात्र, दुर्दैवाने साबळे हे कंटेनरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रा. डोके यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साबळे यांच्या निधनाने राहुरी शहर व परिसरात शोककळा पसरली आहे. आपल्या शांत, संयमी व आदर्शवत कार्यामुळे ते विद्यार्थ्यांसह समाजमनात आदराचे स्थान मिळवून होते. एका नामवंत व कर्तृत्ववान शिक्षकाचा अशा प्रकारे झालेला करुण अंत सर्वांना चटका लावणारा ठरला आहे.
नगर-मनमाड महामार्गावरील अपघातांची भीषण मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. फक्त आठ दिवसांत झालेल्या चार अपघातांत चौघांचा मृत्यू झाला आहे. नगर-मनमाड महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. काल (मंगळवार) सकाळी राहुरी एमआयडीसी परिसरात झालेल्या अपघातात वडनेर येथील 31 वर्षीय युवक ज्ञानदेव बलमे याचा मृत्यू झाला. तर गुहा येथे झालेल्या दुसऱ्या अपघातात अकोले तालुक्यातील एक जण ठार झाला तर विद्यापीठ परिसरात एका जगधने नामक महिलेचा मृत्यू झाला होता तेच आज पुन्हा राहुरी खुर्द येथे झालेल्या अपघाताने चौथा बळी घेतला.
नगर-मनमाड महामार्गावरील खड्डेमय रस्ता, अवजड वाहनांचा वेग, वाहतुकीतील बेफिकिरी आणि संबंधित विभागाचा निष्क्रिय कारभार हे अपघाताचे प्रमुखकारण मानले जात आहे. सामाजिक माध्यमांतून नागरिक सातत्याने संताप व्यक्त करत असून, शासन-प्रशासनाविरोधात रोष वाढत आहे. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि सामान्य नागरिकांचे प्राण धोक्यात येत आहेत.
नगर-मनमाड महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, राहुरी खुर्द येथे आणखी एका निरापराधाचा बळी, सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश साबळे यांचा अपघातात जागीच मृत्यू ; आठ दिवसांत चौघांचा बळी

0Share
Leave a reply












