मानोरी (राहुरी) / सोमनाथ वाघ (ता. १ सप्टेंबर) : मानोरी परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांत भीतीचं सावट अधिकच गडद होत चाललं आहे. आज पहाटे पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला चढवून दोन कालवडींचा बळी घेतला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
आज सोमवार (१सप्टेंबर) रोजी पहाटे सुमारास आसिफ हमाजेखाँ शेख यांच्या घरासमोर बांधलेल्या कालवडींवर बिबट्याने हल्ला केला. ग्रामस्थ बाहेर धावत आले असता दोनही कालवडी फाडलेली दिसून आली. हा प्रकार पाहून ग्रामस्थ भयभीत झाले. हल्ल्यानंतर बिबट्या उसाच्या शेताच्या दिशेने पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या परिसरात मागील काही महिन्यांपासून बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. कुत्रे, शेळ्या, मेंढ्या यांच्यासह अनेक पाळीव प्राण्यांचा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे.ग्रामस्थांनी वनविभागाकडे लेखी निवेदन देऊन पिंजरा तातडीने लावण्याची, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची, नुकसानग्रस्त आसिफ शेख यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची आणि परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहन करत लवकरच पिंजरे बसवले जातील, अशी माहिती दिली. तसेच बिबट्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, परिसरात भीतीचे वातावरण असल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष दक्षता घ्यावी, लहान मुलांना एकटे सोडू नये, अशा सूचना वनविभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
मानोरीत बिबट्याचा धुमाकूळ कायम – दोन कालवडी ठार; ग्रामस्थांत भीती, पिंजरा लावण्याची वनविभागाकडे मागणी

0Share
Leave a reply












