SR 24 NEWS

जनरल

तमनर आखाडा येथील वारकरी सुखदेव तमनर यांचे वारीदरम्यान हृदयविकाराने निधन; तमनर आखाडा गावात वारकरी संप्रदायात शोककळा

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : तमनर आखाडा येथील प्रसिद्ध वारकरी, साधनाशील आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व असलेले सुखदेव बाजीराव तमनर (वय ६४) यांचे पंढरपूरच्या वारीदरम्यान १ जुलै रोजी सायंकाळी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे तमनर आखाडा गावावर आणि संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

सुखदेव तमनर हे गेल्या अनेक दशकांपासून वारकरी संप्रदायाशी निष्ठेने व प्रेमाने जोडले गेले होते. विठ्ठलनामाच्या भक्तीत त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही त्यांनी संपूर्ण तयारीनिशी पंढरपूर वारीसाठी दिंडीत सहभाग घेतला होता. मात्र, वारीदरम्यान अचानक त्यांच्या तब्येतीत बिघाड झाला आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. एक साधा, नम्र, शांत, आणि सुसंस्कृत स्वभाव असलेल्या तमनर यांचा समाजातील प्रत्येक थरात आदर होता. सामाजिक, धार्मिक कार्यात ते नेहमी अग्रेसर राहिले. गावातील विविध सांस्कृतिक आणि वारकरी उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.

सुखदेव तमनर यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रीकांत तमनर व भारत तमनर हे त्यांचे पुत्र असून, ह.भ.प. दत्तात्रय महाराज तमनर (पेंटर) यांचे ते चुलते होते. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील रामदास नारायण तमनर आणि युवा उद्योजक व माजी उपसरपंच आप्पासाहेब नारायण तमनर यांचेही ते चुलते होते.

त्यांच्यावर तमनर आखाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत नातेवाईक, मित्रपरिवार, गावकरी, वारकरी बांधव तसेच परिसरातील अनेक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ मृदंगाच्या गजरात, “राम कृष्ण हरी” च्या जयघोषात आणि अश्रूंनी डोळे पाणावलेले हजारो वारकरी त्यांना अखेरचा निरोप देताना दिसले.

सुखदेव तमनर यांच्या निधनाने एक ज्येष्ठ वारकरी, समाजसेवक आणि गावासाठी आधारवड हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांची आठवण कायम मनात राहील, असे भावपूर्ण शब्दांत गावकऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!