SR 24 NEWS

इतर

वांबोरी परिसरात बिबट्याचा थरार ; वन विभागाच्या ‘पिंजरे’ नीतीवर शेतकऱ्यांचा तीव्र संताप

Spread the love

 प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : वांबोरी आणि परिसरातील ग्रामीण भागात सध्या बिबट्याने प्रचंड धुमाकूळ घातला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार दर्शन देऊनही वन विभाग केवळ पिंजरे लावून ‘हात झटकण्याचे’ काम करत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या दोन वर्षांत नेमके किती बिबटे जेरबंद झाले, याची कोणतीही अधिकृत माहिती समोर येत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या मते, वन विभाग केवळ पिंजरे आणून ठेवतो, परंतु ते योग्य ठिकाणी लावणे, भक्ष ठेवण्याची पद्धत आणि बिबट्यापासून संरक्षणासाठी घ्यायची खबरदारी याबाबत कोणतेही मार्गदर्शन करत नाही.

परिणामी, बिबट्याचा वावर कमी न होता उलट धोक्यात वाढ होत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांचे पशुधन दगावले आहे. मात्र, ‘पंचनामा’ आणि ‘पाठपुरावा’ या तांत्रिक प्रक्रियेत शेतकरी अडकून पडला आहे. “कोणाला किती नुकसान भरपाई मिळाली? आणि प्रलंबित अर्जांचे काय झाले?” याबाबत वन विभागाने पारदर्शक माहिती जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. वन खात्याने ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ ठोस पावले उचलण्याची गरज आहे. बिबट्या प्रवण क्षेत्रात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरे बसवावेत, शेतकऱ्यांसाठी तातडीने जनजागृती मोहीम राबवावी, पशुधनाच्या नुकसानीची भरपाई देण्याची प्रक्रिया सुटसुटीत आणि पारदर्शक करावी. अशा परिस्थितीत शासनाकडे शेतकऱ्यांच्या या मागण्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!