राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर गोटुंबा आखाडा येथे नारीशक्ती एकता महिला मंडळाने यंदा एक अनोखा व स्तुत्य उपक्रम राबवला आहे. मंडळातील सर्व महिला भगिनींनी सामूहिक सहभाग घेतला असून, सोनई येथून पायी चालत ‘ज्योत’ आणून गोटुंबा आखाड्यात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. भक्तिभाव, उत्साह आणि महिलांच्या सामूहिक ऐक्याचा हा उपक्रम गावात चर्चेचा विषय ठरला आहे.
या उपक्रमात महिला भगिनींनी पायी चालत सोनई येथून दिव्यज्योत आणताना नवरात्र उत्सवाचे गाणी, जयघोष, देवीचे नामस्मरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महिलांच्या या सामूहिक यात्रेत एकात्मता, श्रद्धा व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले.
या विशेष उपक्रमात ज्योती राजेंद्र डोईफोडे, पुष्पा बाळासाहेब गोरे, उषा अशोक मंडलिक, परिगा अर्जुन वाणी, वैशाली राजेंद्र सुपुत्रे, कोमल लक्ष्मण जावळे, सोनाली अरुण हारदे, हिरा सुखदेव बाचकर, कल्पना बाळासाहेब मैड, सीताबाई बोरकर, शांता मधुकर बागुल या महिला भगिनींनी सहभाग घेतला. या सर्व सहभागी महिलांनी देवीच्या भक्तीसोबतच स्त्रीशक्तीचे ऐक्य व नारीशक्तीचा जागर देखील या उपक्रमातून घडवला आहे.
गावातील नागरिकांनी या महिला मंडळाच्या उपक्रमाचे स्वागत करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक नसून, सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतिक असल्याचा संदेश या अनोख्या पायी ज्योत यात्रेतून देण्यात आला आहे.
गोटुंबे आखाडा येथे नारीशक्ती महिला मंडळाचा अनोखा उपक्रम : सोनईहून पायी ज्योत आणून देवीची प्रतिष्ठापना

0Share
Leave a reply












