SR 24 NEWS

राजकीय

अतिवृष्टीचे पंचनामे करीत बसण्यापेक्षा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी 50 हजाराची मदत द्यावी – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

Spread the love

तुळजापूर, दि. 25 (चंद्रकांत हगलगुंडे) : धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, पंचनामे करून मदत देण्यापेक्षा सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी ठाम मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मधुकरराव चव्हाण म्हणाले की, “सध्या शेतामध्ये सर्वत्र पाणी व चिखल असल्यामुळे पंचनामा करण्यासारखी परिस्थितीच नाही. कोणताही अधिकारी अशा परिस्थितीत शेतामध्ये उतरू शकत नाही. मग पंचनामा कशाचा करायचा? म्हणूनच राज्य सरकारने थेट व तातडीने सरसकट आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत, संस्थानने यापूर्वी अनेक ठिकाणी विविध स्वरूपात मदत केल्याचे सांगितले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले असून, काहींच्या घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले आहे. तसेच छोट्या व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असल्याने मंदिर संस्थानकडून अशा घटकांना मदत होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतही प्रश्न उपस्थित केला. “दरवर्षी तुळजाभवानीच्या नवरात्रात तुळजापूरच्या परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. मात्र यावर्षी अशी दुरुस्ती होताना दिसत नाही. आंध्र-कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी चालत नळदुर्ग-तुळजापूर मार्गे येतात. परंतु रस्त्याच्या कडेला गवत वाढलेले असून अतिवृष्टीमुळे त्याचा त्रास भाविकांना होणार आहे. त्यामुळे हे गवत तात्काळ काढून रस्ते सुरक्षित करावेत,” अशी मागणीही त्यांनी केली.

अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पंचनाम्याच्या विलंबाऐवजी तातडीने हेक्टरी 50 हजार रुपये सरसकट मदत देण्याचा ठाम आवाज माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवला आहे.

 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!