संगमनेर प्रतिनिधी : संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रसाद गुंजाळ या तरुणाला पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर आमदार समर्थकांनी राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करीत मोर्चा काढला होता. मात्र, आता आरोपी प्रसाद गुंजाळची आई अनिता गुंजाळ यांनी पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
अनिता गुंजाळ यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “घटनेचं मी समर्थन करत नाही; मात्र या हल्ल्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. आमदार अमोल खताळ यांनी माझ्या मुलाची आर्थिक फसवणूक केली असून त्यातूनच हा प्रकार घडला आहे. आमदारांनी माझ्या मुलाकडून सह्या केलेले कोरे चेक घेतले. त्यामुळे तो गेल्या वर्षभरापासून मानसिक तणावाखाली होता.”
त्यांच्या मते, अमोल खताळ यांनी वारंवार पोलिस गाड्या पाठवून प्रसादला धमकावलं, ब्लॅकमेल केलं आणि सतत दबाव टाकला. त्यामुळे त्याने आत्महत्येचाही विचार केला होता. प्रसाद गुंजाळ आणि अमोल खताळ हे अनेक वर्षांपासून जिवलग मित्र होते. कौटुंबिक समारंभ, वाढदिवसही त्यांनी एकत्र साजरे केले. मात्र, आर्थिक व्यवहारातील वादामुळे प्रसाद उद्विग्न अवस्थेत गेला, पैसे परत करूनही त्याच्याकडे असलेले चेक पुन्हा टाकून त्याची फसवणूक करण्यात आली, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
“माझा मुलगा चुकीचं पाऊल उचलला, त्याचं समर्थन मी करत नाही. पण त्याला या टोकापर्यंत नेणाऱ्यांना मी आई म्हणून कधीही माफ करणार नाही. आज आमच्या कुटुंबाची बदनामी झाली आहे. गावात व नातेवाईकांत आम्हाला नावं ठेवली जात आहेत. आमच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. आमचं काही वाईट झाल्यास त्याला आमदार अमोल खताळ आणि त्यांचे सहकारी जबाबदार असतील,” असा स्पष्ट इशारा अनिता गुंजाळ यांनी तक्रारीत दिला आहे.
Leave a reply













