विशेष प्रतिनिधी पारनेर /वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील मौजे ढोकी येथील श्री. ढोकेश्वर मंदिर परिसरात नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटन वैभव लाभले आहे. टाकळी ढोकेश्वर परिसराला पर्यटन वैविध्य असून, हे जगभरापर्यंत पोहचवण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ढोकेश्वर मंदिर परिसरासाठी ४० लाख व तालुक्यातील पाच विविध देवस्थाने व धार्मिक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी अशा एकूण २ कोटींच्या पर्यटन अनुषंगिक कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार काशिनाथ दाते यांनी दिली.
या विकास कामाच्या मंजुरीमुळे टाकळी ढोकेश्वरसह तालुक्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती, अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल,सुविधा आणि पर्यटकांच्या सोयींमध्ये मोठी वाढ होणार असल्याचा विश्वास आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केला.
प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ही कामे राबवली जाणार असून, ढोकेश्वर मंदिर परिसरातील सुविधा उभारणी,थिम आधारित नियोजन, पायाभूत रचना सदृढ करणे, स्वच्छता व्यवस्था, प्रवेशमार्ग सुधारणा यांसारख्या गरजांवर भर देण्यात येणार आहे. कामे वेळेवर व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पुर्ण करण्यासाठी शासनाने कठोर अटी घातल्या असून निधीचा पारदर्शक वापर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक श्री ढोकेश्वर मंदिर परिसर विकास आराखड्यांतर्गत ढोकी गावातील ग्रामस्थांनी आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने आमदार दाते यांनी पर्यटन विकासाचा आराखडा तयार करून ढोकी ग्रामस्थांच्या मागणीनंतर अवघ्या पंधरा दिवसांतच निधी मंजूर झाल्याने ढोकी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ढोकेश्वर मंदिरासाठी ४० लाखांचा निधी मिळाल्याने ढोकी ग्रामस्थांनी आमदार दाते यांचे आभार मानले आहेत.
प्राचिन शैलीशी साधर्म्य असणारी कामे
ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची कामे पुरातत्व विभागामार्फत करताना मूळ वास्तू आणि प्राचीन शैली यांच्याशी साधर्म्य असणारी कामे दिसतील, याकडे लक्ष दिले जाईल. ऐतिहासिक, पौराणिक भौगोलिक स्थान ही राष्ट्रीय अभियानाचे प्रतिके असल्याने हा इतिहास जतन करून ठेवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच या कामांमुळे तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळेल.
— आमदार काशिनाथ दाते (विधानसभा सदस्य)
श्री ढोकेश्वर मंदिर पर्यटन विकासासाठी ४० लाखांचा निधी, पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती

0Share
Leave a reply












