बाभुळगाव प्रतिनिधी / रावसाहेब पाटोळे : ग्रामीण भागातील अनेक तरुण अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत MPSC व UPSCच्या अभ्यासात झोकून देतात. मात्र, यशाचा मार्ग नेहमीच सोपा नसतो. काहीजण पहिल्याच अपयशाने मागे फिरतात, तर काही जिद्दी तरुण सातत्याने प्रयत्न करून शेवटी आपल्या नावावर यशाची नोंद करून दाखवतात. अशाच जिद्दीचा, चिकाटीचा आणि आत्मविश्वासाचा प्रेरणादायी प्रवास म्हणजे बाभुळगावचा गणेश रामदास तमनर!
नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य सेवा परीक्षेच्या निकालात गणेशने राज्यात मानाचा क्रमांक पटकावला असून त्याची प्रथम वर्ग अधिकारी म्हणून निवड झाली आहे. शेतकरी कुटुंबातील गणेशने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. गणेशने आपले प्राथमिक शिक्षण बाभुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत घेतले. उच्चशिक्षणासाठी कुठलाही मोठा पार्श्वभूमीचा आधार नसतानाही गणेशने अपार मेहनतीच्या जोरावर हे ध्येय गाठले. अनेकवेळा अपयशाचे चटके बसले तरी त्याने कधी हार मानली नाही. “प्रथम वर्ग अधिकारीच होणार” या ध्येयाने झपाटलेला गणेश अपयशांवर मात करत अखेर यशाच्या शिखरावर पोहोचला.
या उल्लेखनीय यशामुळे बाभुळगाव गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशचे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार आणि सर्व ग्रामस्थांनी त्याचे मन:पूर्वक अभिनंदन केले. गावातील ज्येष्ठ नागरिक म्हणाले, “बाभुळगावचा बिरुदेव ढोणे ठरलेला गणेश तमनर आज गावाचा अभिमान बनला आहे.”
शेतकऱ्याचा मुलगा राज्यसेवा परीक्षेत बनला प्रथम वर्ग अधिकारी, बाभुळगावच्या गणेश तमनरने उंचावला गावाचा मान — राज्यसेवेत मिळवला यशाचा मुकुट”

0Share
Leave a reply












