मानोरी (राहुरी ) /सोमनाथ वाघ : अहिल्यानगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभावी जिल्हाध्यक्ष रवींद्र बापूसाहेब मोरे यांनी संघटनेला सोडचिठ्ठी देत मंगळवारी रात्री मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोरे यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेना (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला. त्याच वेळी मोरे यांची पश्चिम महाराष्ट्र शेतकरी सेना उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला आहे. कारण मोरे हे केवळ जिल्हाध्यक्ष नव्हते, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक, आंदोलनशील व धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांची जिल्हाभर ओळख आहे.
मोरे यांनी ऊसदर, वीजदर, हमीभाव, दुष्काळी मदत यांसारख्या मुद्द्यांवर अनेकवेळा ठिणगी उडवणारी आंदोलने केली होती. त्यांच्या नेतृत्वामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जिल्ह्यात ताकद मिळाली होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी राजू शेट्टींचा हात झटकत शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे.
मोरे यांच्या या प्रवेशानंतर नगर जिल्ह्यातील राजकीय गणिते मोठ्या प्रमाणात बदलण्याची चिन्हे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता ‘नेतृत्वशून्य’ होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे मोरे यांच्या नेतृत्वामुळे शिवसेना शिंदे गट जिल्ह्यात अधिक बळकट होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अहिल्यानगरमध्ये मोठा राजकीय भूकंप – शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

0Share
Leave a reply












