देवळाली प्रवरा (ता. राहुरी) : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपले प्रलंबित आर्थिक हक्क मिळावेत यासाठी आवाज बुलंद केला आहे. यासाठी त्यांनी दिनांक २६ ऑगस्ट रोजी नगरपरिषदेला निवेदन सादर केले. गेल्या ७ ते ८ वर्षांपूर्वी नगरपरिषदेतून सेवानिवृत्त झालेले अनेक कर्मचारी आजतागायत निवृत्तीवेतन, रजा रोखीकरण व इतर हक्कांची रक्कम न मिळाल्याने मोठ्या अडचणीत आहेत. शासन नियमांनुसार हे लाभ वेळेत देणे बंधनकारक असूनही संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने हे निवेदन नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक दीपक जागरवाल यांना देण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी गीताराम मोरे, दत्तात्रय कदम, मुकुंद ढुस, कानिफनाथ जाधव, ज्ञानदेव शेटे, राजेंद्र थिगळे, निवृत्ती खांदे, बबन दिवे, राजेंद्र खरात, भाऊसाहेब पठारे, शिवाजी पठारे, आयुब शेख, महंमद शेख आदी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर त्यांच्या थकबाकीची रक्कम मंजूर करून देण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.













