राहुरी ( सोमनाथ वाघ ) : राहुरी तालुक्याच्या पूर्वभागाच्या दळणवळणाच्या दृष्टिने महत्त्वाचा असणाऱ्या राहुरी-मांजरी या रस्त्याची यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने अत्यंत दयनिय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठी खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने प्रवास करणे जिकरीचे बनले आहे. याविषयी प्रवासी वर्गामधून संताप व्यक्त होत असून या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.
राहुरी ते मांजरी रस्त्याचे काम केवळ मलमपट्टी केली असून यावर्षी झालेल्या पावसाने या रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहन धारकांसाठी हा रस्ता डोकेदुखी ठरत आहे. हा दोन्हीही बाजुने काटेरी झुडपाच्या विळख्यात सापडला असून अनेकदा अरुंद रस्त्यामुळे अपघातही झाले आहेत. तसेच या रस्त्यावरील
दिशादर्शक फलक झाडा-झुडपात दिसत नसल्याने अडचण निर्माण होत आहे. हा रस्ता राहुरी व नेवासेला जोडणारा जवळचा रस्ता म्हणून या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. त्याचप्रमाणे राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी, आरडगाव, कोंढवड, शिलेगाव, मानोरी, वळण, केंदळ, चंडकापूर, पिंप्री, मांजरी तसेच नेवासा तालुक्यातील पानेगाव आदी गावांतील जनतेची, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची या रस्त्यावरून रहदारी सुरू असते.
या रस्त्याच्या अवस्थेमुळे अनेक अपघातही घडले आहेत. त्यात अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचे शरीर व वाहने खिळखिळे झाली आहेत. अनेकदा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तरी प्रशासनाने या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी प्रवाशी, शेतकरी, विद्यार्थी व नोकरदार वर्गातून होत आहे.
Leave a reply













