SR 24 NEWS

जनरल

मानोरीतील सहकारी सोसायटीत गणरायाचे जल्लोषात आगमन,  सचिव, सहसचिव आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पारंपरिक पूजन

Spread the love

मानोरी (राहुरी) / सोमनाथ वाघ : मानोरी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये गणरायाचे आगमन मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडले. पारंपरिक व सांस्कृतिक वातावरणात बाप्पांची प्रतिष्ठापना करून सोसायटीत उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला आहे. सोसायटीचे सचिव काशिनाथ काळे आणि सहसचिव भीष्मराज गरुड यांच्या हस्ते विधीवत पूजन करून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पूजन विधीमध्ये सोसायटीमधील सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या प्रसंगी सोसायटीचे चेअरमन शरदराव पोटे, ज्ञानदेव शेळके, चंद्रकांत पोटे यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

सोसायटीच्या सभागृहात पारंपरिक सजावट, रांगोळ्या आणि फुलांनी गणरायाचे स्वागत करण्यात आले. लाडक्या बाप्पासाठी विशेषरूपाने नैवेद्य तयार करण्यात आला होता.यंदाचा उत्सव ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या संकल्पनेवर आधारित असून, मूर्ती मातीची असून त्याचे विसर्जन स्थानिक कृत्रिम जलकुंडातच करण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन शरदराव पोटे यांनी दिली.

ग्रामस्थांचा सहभाग, एकोपा आणि श्रद्धा यामुळे मानोरीतील गणेशोत्सव हे फक्त धार्मिक उत्सव न राहता सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरत आहे. सोसायटीच्या वतीने हा उत्सव शांतता, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला जात आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!