राहुरी तालुका (प्रतिनिधी) / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा गावात ग्रामसभेत सामाजिक ऐक्य आणि शांततेचा विचार करून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. 15 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत गणेशोत्सव काळात डीजे व ध्वनीप्रदूषण करणारी साधने वापरण्यास सक्त मनाई करण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनिषा अप्पासाहेब तमनर होत्या. यावेळी ग्रामसेवक भाऊसाहेब पवार, उप सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थ, युवक मंडळे आणि महिलांनी डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना होणारा त्रास तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या अडचणी याबाबत चिंता व्यक्त केली. त्यानंतर ग्रामस्थांच्या संमतीने डीजे बंदीचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या व शासनाच्या वतीने या ठरावाचे काटेकोर पालन करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा ग्रामसभेत देण्यात आला.
यामुळे तमनर आखाडा येथे येणारा गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने, ढोल-ताशांच्या गजरात व सांस्कृतिक-धार्मिक वातावरणात उत्साहाने साजरा होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गणेशोत्सवात डीजे बंदीचा तमनर आखाडा ग्रामसभेचा एकमुखी ठराव, सामाजिक ऐक्यासाठी तमनर आखाडा ग्रामस्थांचा गणेशोत्सवात डीजेला विरोध

0Share
Leave a reply












