SR 24 NEWS

राजकीय

लिंगायत समाजाला स्वतंत्र रुद्रभूमी मिळणार – खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश

Spread the love

नांदेड प्रतिनिधी /  धम्मदिप भद्रे कांडाळकर : हिंदू वीरशैव लिंगायत समाजासाठी स्वतंत्र रुद्रभूमी (स्मशानभूमी) उपलब्ध करून देण्याच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र शासनाने या संदर्भात कार्यवाही सुरू केली आहे. लिंगायत समाजाची लोकसंख्या लक्षात घेऊन प्रत्येक गावात व शहरात रुद्रभूमीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना नगर विकास विभागाने सर्व नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका तसेच संबंधित विभागांना दिल्या आहेत. तातडीने आवश्यक माहिती सादर करण्याचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय व वास्तव्याच्या निमित्ताने पसरलेला वीरशैव लिंगायत समाज हिंदू परंपरा, संस्कृती आणि देवी-देवता यांचे पालन करतो. या समाजात दहनाऐवजी जमिनीत अंत्यसंस्कार करण्याची परंपरा असल्याने स्वतंत्र जागेची आवश्यकता भासते. मात्र, अनेक ठिकाणी अशी सोय नसल्याने अंत्यविधीचा प्रश्न वारंवार निर्माण होत होता. या समस्येचे गांभीर्य ओळखून खा. डॉ. गोपछडे यांनी 26 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्परतेने सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाला आदेश दिले आणि त्यानुसार कार्यवाही सुरू झाली.

दरम्यान, शासनाच्या गॅझेटमध्ये ‘दफनभूमी’ असा उल्लेख असल्याबद्दल समाजाने आणि खासदार गोपछडे यांनी आक्षेप घेतला होता. त्याऐवजी ‘रुद्रभूमी’ असा शब्दप्रयोग करण्यात यावा, अशी मागणी मान्य करून शासनाने आता अधिकृतरीत्या ‘रुद्रभूमी’ हा शब्द वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असून, समाजाला त्यांच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र रुद्रभूमी उपलब्ध होणार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!