राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलिसांनी तत्परता आणि शिताफीने केलेल्या कारवाईत डिझेल चोरी करून दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा आरोपींना पकडले असून दोन आरोपी पळून गेले आहेत. या घटनेत एक अल्पवयीन मुलगाही सहभागी होता.दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे सुमारे पाच वाजता राहुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांना नगर-मनमाड हायवेवर काही इसम डिझेल चोरीसाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोसई मुरकुटे, पोना प्रविण अहिरे, पोकाँ सतीश कुहाडे, पोकाँ अंबादास गिते, पोकाँ नदीम शेख, पोकॉ अंकुश भोसले यांचा समावेश असलेल्या गुन्हे शोध पथकाने शोध मोहिम राबवली.
शोधादरम्यान राहुरी येथील पाण्याच्या टाकीजवळ तिघे संशयित उभे दिसले. विचारपूस करताना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना त्यांच्या कपड्यांमधून डिझेलचा वास आल्याने संशय बळावला. आणखी विचारणा करताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून त्यांना पकडले.ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे अजय सोमनाथ मोगले (रा. राहाता), यश सुनिल जाधव (रा. जेऊर पाटोदा, कोपरगाव) आणि एक अल्पवयीन मुलगा अशी आहेत. त्यांच्या चौकशीतून उघड झाले की, हे आरोपी दोन अन्य साथीदारांसह – शेखर शिंदे (रा. शिबलापुर, संगमनेर) आणि तात्या उर्फ शेखर अमोलिक (रा. राहाता) – पांढऱ्या रंगाच्या इंडिका कारमधून प्लास्टिक ड्रम, नळी, लोखंडी टॉमी आणि चाकू वापरून हायवेवर उभ्या असलेल्या ट्रकमधील डिझेल चोरी करून दरोड्याचा प्रयत्न करत होते.
या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 887/2025, भा.दं.सं. कलम 310(4)(5) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून तिघा आरोपींना अटक करून न्यायालयीन पोलिस कोठडी मिळाली आहे. अल्पवयीन मुलाला बालन्याय मंडळासमोर हजर केले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून यापूर्वीही त्यांनी अनेक ठिकाणी डिझेल चोरी केल्याची शक्यता आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोसई मुरकुटे, पोहेकाँ सूरज गायकवाड, पोहेकों राहुल यादव, पोना प्रविण अहिरे, चापोना रोकडे, पोकाँ सतीश कुहाडे, पोकाँ प्रमोद ढाकणे, पोकाँ अंबादास गिते, पोकाँ नदीम शेख, पोकाँ अंकुश भोसले, पोकाँ सचिन ताजणे, सायबर सेलचे पोना सचिन धनाड, पोकाँ संतोष दरेकर आणि पोकाँ रामेश्वर वेताळ यांच्या पथकाने केली.
डिझेल चोरी व दरोड्याचा प्रयत्न उधळला; राहुरी पोलिसांची शिताफीने कारवाई, तिघे जेरबंद, दोघे फरार

0Share
Leave a reply












