मानोरी (प्रतिनिधी) /’सोमनाथ वाघ : राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अंबिका माध्यमिक विद्यालयात आज 14 ऑगस्ट रोजी एक हृदयस्पर्शी आणि संस्मरणीय प्रसंग घडला. 1992 साली या शाळेतून शिक्षण पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने, आपल्या शिक्षणसंस्थेबद्दल ऋण व्यक्त करत, अहुजा कंपनीचे रु. 32,200 किंमतीचे अत्याधुनिक साउंड सिस्टीम भेट स्वरूपात प्रदान केले.
हा लोकार्पण सोहळा शाळेच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मुख्याध्यापक तारडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षकवृंद, विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच 1992 बॅचचे प्रतिनिधी, ग्रामस्थ व इतर विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त करत सांगितले, “या शाळेने आम्हाला दिलेले शिक्षण, संस्कार आणि जीवनाची दिशा अमूल्य आहे. तिचे ऋण फेडण्याचा हा आमचा एक छोटा पण मनापासून केलेला प्रयत्न आहे.” त्यांनी सांगितले की, ही भेट फक्त एक उपकरण नाही तर आपल्या जुन्या आठवणींना जिवंत ठेवणारे एक माध्यम आहे.विद्यालय व्यवस्थापनाने या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. मुख्याध्यापक तारडे यांनी सांगितले की, या साउंड सिस्टीममुळे सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय सण, सभा आणि विविध उपक्रम अधिक प्रभावी व आकर्षक पद्धतीने पार पडतील. “विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांची ही देणगी प्रेरणादायी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमानंतर माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात फेरफटका मारला. जुन्या वर्गखोल्या, खेळाचे मैदान, तासोन्तास घालवलेल्या जागा पाहून त्यांच्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. शिक्षकांशी झालेल्या गप्पा, जुन्या मित्रांच्या भेटी आणि शाळेच्या आत्मीय वातावरणाने प्रत्येकाच्या मनात भावुकता दाटून आली.
कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक तारडे सर यांनी आभार प्रदर्शनाने केला. त्यांनी 1992 बॅचच्या या उपक्रमाला “खऱ्या अर्थाने शाळेप्रेम आणि संस्कारांची जपणूक” असे संबोधले.
Leave a reply













