SR 24 NEWS

जनरल

एलसीबीतील १८ अंमलदार कार्यमुक्त; बदली ठिकाणी हजर होण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

Spread the love

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) बदली होऊनही कार्यमुक्त न झालेल्या ११ पोलीस अंमलदारांसह, पथक रद्द होऊनही एलसीबीत कार्यरत असलेल्या ७ अंमलदारांना – अशा एकूण १८ अंमलदारांना त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत.

एलसीबीवर अलीकडे वारंवार आरोप होत असल्याने अधीक्षकांनी शाखेवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. प्रशासकीय बदली झाल्यानंतरही काही अंमलदार वर्षानुवर्षे एलसीबीतच राहिले होते. प्रभारी अधिकार्‍यांचे पाठबळ मिळाल्याने त्यांची मुजोरी वाढल्याचे बोलले जात होते. काही अंमलदार कार्यक्षम होते, तर काही केवळ चापलुसी करण्यातच पुढे होते. अखेर अधीक्षकांनी थेट आदेश देऊन त्यांना कार्यमुक्त केले.

८ ऑगस्ट रोजी काढलेल्या आदेशानुसार बदली झालेल्या ११ अंमलदारांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र तात्काळ बदली ठिकाणी पाठवावे.ते हजर न झाल्यास, संबंधित पोलीस ठाण्याचे/शाखेचे प्रभारी अधिकारी ऑगस्ट २०२५ चे वेतन रोखून कसुरी अहवाल पाठवतील.पथक रद्द होऊनही एलसीबीत काम करणाऱ्या ७ अंमलदारांनाही मूळ नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. ते हजर नसल्यास याचप्रमाणे वेतन रोखून अहवाल पाठवावा. सध्या एलसीबीत मूळ नेमणुकीचे फक्त ४ अंमलदार आहेत. कार्यमुक्त करण्यात आलेल्या अंमलदारांपैकी काही सायबर पोलीस ठाण्यातून संलग्न आहेत. त्यांना त्यांच्या सायबर पोलीस ठाण्यात परत करण्यात येईल. काहींची नवीन नेमणूक एलसीबीत, तर काहींची बदली त्यांच्या विनंतीवरून इतर शाखांमध्ये केली जाणार आहे.

“वर्षानुवर्षे एलसीबीत कार्यरत असणाऱ्यांना त्यांच्या बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले आहे. एलसीबीसाठी नवीन अंमलदारांची नियुक्ती दोन दिवसांत केली जाईल.”

सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक

 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!