सोनई वेब प्रतिनिधी (मोहन शेगर ) – भारताचे माजी सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्लीचे मा. न्यायमूर्ती डॉ. धनंजय वाय. चंद्रचूड हे रविवार, दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिध्द धार्मिक स्थळे शनिशिंगणापुर आणि शिर्डी येथे दर्शनासाठी आगमन करणार आहेत. त्यांच्या या खासगी धार्मिक दौऱ्याबाबत जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून, संपूर्ण दौऱ्यादरम्यान ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
दौऱ्याच्या कार्यक्रमानुसार, डॉ. चंद्रचूड हे सकाळी ७.०० वाजता छत्रपती संभाजीनगर येथून मोटारीने प्रस्थान करून सकाळी ८.३० वाजता अहमदनगर तालुक्यातील शनिशिंगणापुर येथे दाखल होतील. तेथे श्री शनिदेवाचे दर्शन घेऊन विशेष पूजेत सहभागी होतील. सकाळी ९.१५ वाजता ते शिर्डीकडे प्रयाण करतील.
सकाळी १०.४५ वाजता शिर्डी येथे पोहोचल्यावर श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतील व सकाळच्या आरतीस उपस्थित राहतील. धार्मिक विधी आणि दर्शन कार्यक्रमानंतर ते शिर्डीतील शासकीय विश्रामगृहात विसावतील.यानंतर दुपारी ३.१० वाजता शिर्डी शासकीय विश्रामगृहातून शिर्डी विमानतळावर रवाना होऊन दुपारी ३.४० वाजता विमानतळावर पोहोचतील. तेथून सायंकाळी ४.१० वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील.
डॉ. चंद्रचूड यांच्या या दौऱ्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन, मंदिर संस्थान आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय साधून सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेची काटेकोर आखणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिक व भाविकांमध्ये त्यांच्या आगमनाबाबत उत्सुकता असून, दोन्ही धार्मिक स्थळांवर भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड आज शनिशिंगणापुर व शिर्डी दौऱ्यावर

0Share
Leave a reply












