संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर आगारात शनिवार, दिनांक ०२ ऑगस्ट रोजी सकाळी ७:४५ वाजता हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. बस स्थानकात कोल्हापूर कुरुंदवाड आगाराच्या बसने दिलेल्या धडकेत संगमनेर कॉलेजचे सेवानिवृत्त लेखापाल संजय विनायक संभूस (वय ७२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बस क्रमांक एमएच ५१ सी ०३६३ ने दिलेल्या धडकेनंतर संभूस खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला तसेच हाताला आणि बरगड्यांना गंभीर इजा झाली. चाक अंगावरून गेल्याने त्यांच्यावर तातडीने मेडिकव्हर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. प्रचंड रक्तस्राव झाल्याने रविवारी पहाटे ३ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. डॉक्टर बोधे आणि डॉ. हासे यांचे उपचारात मोलाचे योगदान लाभले, असे नातेवाईकांनी सांगितले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या माहितीनुसार, अपघातावेळी बस स्थानकातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. आगार प्रमुख प्रशांत गुंड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संजय संभूस हे अत्यंत शांत, परोपकारी, हसतमुख आणि सर्वांना आपलेपणाने वागवणारे व्यक्तिमत्त्व होते. संगमनेर कॉलेजमध्ये त्यांनी ३६ वर्षे लेखापाल म्हणून प्रामाणिक सेवा बजावली. त्यांच्या पश्चात पत्नी सुजल, मुलगी नीलांगी पूजारी (बंगळुरू), मुलगा सौरभ (टोकियो, जपान), भाऊ नरेंद्र व अजीत, बहीण मंगल, एक नातू असा परिवार आहे. त्यांचे बंधू सुरेश व प्रशांत तसेच बहीण सुलोचना यांचे यापूर्वीच निधन झाले आहे.
आज जागतिक मित्र दिनाच्या दिवशी एक आदर्श मित्र, सहकारी आणि भाऊ आपल्यातून निघून गेला. त्यांच्या निधनाने संगमनेरातील मित्रपरिवार, नातेवाईक आणि समवयस्कांमध्ये शोककळा पसरली आहे.
Leave a reply













