विद्यापीठ प्रतिनिधी / आर. आर. जाधव : बदलत्या हवामानामुळे शेतीत निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून या आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड यांनी केले आहे. हाळगाव येथे आयोजित ऊस लागवड तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, हाळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बनसोड यांनी जागतिक हवामान बदलावर मात करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण किती महत्त्वाचे आहे यावर भर दिला. ते म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना नैसर्गिक शेतीच्या पद्धतींचा अवलंब करणे ही आजच्या काळाची गरज आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि हाळगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे यांनी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाविद्यालयाची कटिबद्धता व्यक्त केली. ते म्हणाले, शेतीला यांत्रिकीकरणाची जोड दिल्याशिवाय शेती अशक्य आहे आणि हेच तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तसेच, विद्यापीठाने विकसित केलेले बियाणे, जैविक खते, कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि विविध प्रकाशने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच विक्री केंद्र सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली.
जामखेडचे तालुका कृषी अधिकारी श्री. रवींद्र घुले यांनी शासनाच्या विविध कृषी यांत्रिकीकरण योजनांची माहिती दिली. प्रगतशील शेतकरी डॉ. दीपक वाळुंजकर यांनी हा कार्यक्रम हाळगाव येथे आयोजित केल्याबद्दल आभार मानले आणि सांगितले की, राहुरी विद्यापीठाचे अंतर आता फक्त १० किमी असल्यासारखे वाटते. अखिल भारतीय समन्वयीत कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी प्रास्ताविकेत शेतीत यांत्रिकीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले.
तांत्रिक सत्रांमध्ये, डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी मफुकृविने विकसित केलेल्या आधुनिक कृषी अवजारे व यंत्रांची माहिती दिली. डॉ.अंबादास मेहेत्रे यांनी ऊस लागवड तंत्रज्ञानावर, डॉ. रविकिरण राठोड यांनी ऊस शेतीसाठी उपयुक्त यांत्रिकीकरणावर, प्रा. महेश पाचारणे यांनी ड्रोन-ऊस शेतीसाठी वरदान या विषयावर, तर डॉ. संजय भांगरे यांनी खोडवा ऊस व्यवस्थापनासाठी उपयुक्त यांत्रिकीकरणावर मार्गदर्शन केले. याव्यतिरिक्त, डॉ. अनिकेत गायकवाड यांनी ‘फुले मायक्रो ग्रेड’ या सूक्ष्म अन्नद्रव्याची माहिती शेतकऱ्यांना दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर प्रगतशील शेतकरी प्रद्युम्न महाजन यांनी ड्रोनबाबत मार्गदर्शन करत फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश पाचारणे यांनी केले तर डॉ. निकिता धाडगे यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात पंचक्रोशीतील ७५ हून अधिक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
Leave a reply













