SR 24 NEWS

जनरल

राहुरी येथे “महसूल सप्ताह – २०२५” उत्साहात साजरा होणार, राहुरीत १ ते ७ ऑगस्टदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन ; नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : महसूल विभागाच्या कार्यकुशलतेचा गौरव करण्यासाठी आणि नागरिकांपर्यंत विभागाच्या विविध सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने “महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन” यांच्या निर्देशानुसार दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी “महसूल दिन” साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत “महसूल सप्ताह – २०२५” राज्यभर राबविण्यात येणार आहे. यानिमित्त राहुरी तालुक्यातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी वेळेवर महसूली कामे पूर्ण करणे, अभिलेख अद्ययावत ठेवणे, वसुली, मोजणी, अपील प्रकरणांची चौकशी या कार्यक्षमतेचा आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचार्‍यांचा सत्कार महसूल दिनी करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांसाठी उपयुक्त विविध सेवा, माहिती व मदतीच्या उद्देशाने प्रत्येक दिवशी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महसूल सप्ताहातील कार्यक्रमांचे तपशील पुढीलप्रमाणे –

१ ऑगस्ट: महसूल दिन साजरा करून सप्ताहाचा औपचारिक शुभारंभ

२ ऑगस्ट: २०११ पूर्वीपासून शासकीय जमिनीवर रहिवासी असलेल्या पात्र कुटुंबांना जागांचे पट्टे वितरण

३ ऑगस्ट: पाणंद/शिवार रस्त्यांची मोजणी व दुतर्फा वृक्षारोपण

४ ऑगस्ट: मंडळनिहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविणे

५ ऑगस्ट: विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना घरभेटी देऊन डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वाटप

६ ऑगस्ट: शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवणे व नियमांनुसार जमिनीचे निवारण

७ ऑगस्ट: M-sand धोरणांची अंमलबजावणी, नविन मानकांनुसार कार्यवाही व सप्ताहाची सांगता

या सप्ताहादरम्यान महसूल अदालती, शिबीरे, जनजागृती उपक्रमांद्वारे नागरिकांना थेट सेवा व मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालय, राहुरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

नागरिकांनी अधिक माहितीसाठी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी अथवा तहसील कार्यालय, राहुरी (कुळकायदा शाखा) येथे स्थापन करण्यात आलेल्या संपर्क कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार नामदेव पाटील यांनी केले आहे.

 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!