रविवार दि. ०६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी निमित्त शिर्डी येथे मालपाणी उद्योग समूहाचे ‘साई तीर्थ थीम पार्क’ आणि ‘वेट एन जॉय’ वॉटर पार्क येथे ‘दिव्य सोहळा वारीचा’ निमित्त राहुरी फॅक्टरी येथील शिवचरित्रकार हसन सय्यद यांचा भारूड रुपी समाजप्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
ज्या कणखर आणि रांगड्या महाराष्ट्राने अनेक संत- महंताचे परखड आणि तिखट भाषेतून समाज प्रबोधन ऐकले. ज्यांच्या संत साहित्य, गाथा, कीर्तन, भारूड यातून समाज जागृतीचे कार्य घडले, असे थोर संत ज्ञानोबा माऊली, संत तुकोबाराय, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, संत एकनाथ महाराज यांचा अध्यात्म म्हणजे संस्कार आणि संस्कृती होय. हे संस्कार म्हणजे समता, बंधुता, एकता होय. असे प्रतिपादन शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी केले. आषाढी एकादशी निमित्त मालपाणी उद्योग समूहाचे ‘साई तीर्थ थीम पार्क’ आणि वॉटर पार्क मधील सर्व कर्मचारी बांधवांनी एकत्र येवून मोठ्या उत्साहाने भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम साजरा केला. या अभूतपूर्व आयोजनात विठुरायाची वारी, टाळ- मृदुंग- पखवाजाच्या तालात भारूड, भजन, पाऊली, फुगडी.. म्हणजे अगदी नयनी पारणे फिटावे असा नेत्रदीपक सोहळा पार पडला.
दरम्यान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते हसन सय्यद यांनी आजवर शिवचरित्रातून शिवरायांचा विचार महाराष्ट्र आणि राज्याच्या बाहेरही जावून पोहोचवला. आषाढी एकादशी निमित्त तरुणांसाठी महाराष्ट्र धर्म वाढवावा या उक्तीप्रमाणे भारुडातून स्त्री-भ्रूण हत्या, सामाजिक बांधिलकी आणि एकात्मता तसेच स्त्री-सन्मान या विषयावर आपल्या अनोख्या शैलीत विनोदी भारूड सादर करत मनोरंजनातून समाजप्रबोधन केले.
आषाढी एकादशी निमित्त सकाळी ९:०० वा. वॉटर पार्क येथे भजन, भारूड, आरती आणि पार्कमध्ये दिंडी संपन्न झाली. त्यानंतर वॉटर पार्क मधून दिंडीचे साई तीर्थ येथे आगमन झाले. भजन व विठुरायाच्या नामघोषात दिंडी विठ्ठल मंदिरापर्यंत जाऊन, तेथे आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. दिंडी सोहळ्यासाठी कर्मचाऱ्यांनी पांढरा कुर्ता- टोपी व महिलांनी पारंपारिक साडी असा महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केला होता.
या दिमाखदार सोहळ्याचे नियोजन मालपाणी उद्योग समूहाचे वॉटर पार्क आणि साई तीर्थ थीम पार्कचे व्यवस्थापन अधिकारी अनुप बजाज, संदिप सदाफळ, सचिन डांगे, अशोक जेजुरकर, रोहित कराड, सचिन सुपेकर, गणेश तांबे, गौतम खवले, अमोल निकम यांनी केले. तर भारूड सादरीकरणात शिवचरित्रकार हसन सय्यद यांना निखिल कराळे यांची साथ लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल कराळे यांनी केले.
Leave a reply













