इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : आषाढी वारीनिमित्त विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडियम स्कूलच्या चिमुरड्यांनी शुक्रवार, दिनांक ४ जुलै २०२५ रोजी भक्तिभावाने भरलेल्या वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन केले.या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूराव थोरात, सचिव विजयभैय्या थोरात, उपाध्यक्ष मारुतराव थोरात, संचालक संगीता थोरात, संतोष थोरात, अजय थोरात, सुशीला थोरात आदी मान्यवरांनी पालखीचे पूजन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी आणि विविध संतांची वेशभूषा परिधान केली होती. छोट्या वारकऱ्यांनी हातात टाळ-मृदंग घेऊन “विठ्ठल नामाचा” गजर करत शाळेपासून दिंडीची सुरुवात केली. ही भक्तिमय दिंडी भैरवनाथ मंदिरापर्यंत नेण्यात आली.
दिंडीत टाळ-मृदंगाच्या गजरासोबतच वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी, हरिनाम संकीर्तन, भारुडे, अभंग, पथनाट्य आणि संतचरित्र सादरीकरण करण्यात आले. विविध संतांच्या शिकवणी आणि कार्यावर आधारित माहिती विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडली.शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संतांचे जीवनकार्य व त्यांचे विचार समजावून सांगितले. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून “ग्रंथ हेच गुरु” या संकल्पनेवर आधारित मार्गदर्शन उज्वला वाघ मॅडम यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रेरणा दिली.
प्राचार्या वंदना थोरात मॅडम यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या संत तुकारामांच्या उक्तीचा संदर्भ देत पर्यावरणाचे महत्त्व विशद केले. तसेच शासनाच्या “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या आईसोबत एक झाड लावावे, असे आवाहन केले.या दिंडी सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, सामाजिक जाणीव आणि पर्यावरणाबाबत प्रेम जागृत केले. अखेर हरिनामाच्या गजरात व टाळ-मृदंगाच्या निनादात या दिंडीचा समारोप करण्यात आला.
Leave a reply













