SR 24 NEWS

क्राईम

घोडेगाव येथे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 13 गोवंशीय जनावरांची सुटका, ४ आरोपी अटकेत; 39.10 लाखांचा मुद्देमाल जप्त – स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई

Spread the love

नेवासा प्रतिनिधी ( मोहन शेगर)  : घोडेगाव (ता. नेवासा) येथे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 13 गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी धडक कारवाई करत सुटका केली असून या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून एकूण 39 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल व वाहतूक रोखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून नेवासा तालुक्यात कारवाईसाठी रवाना करण्यात आले.

दिनांक 03 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे पथक गोवंशीय जनावरांच्या कत्तलखान्यांची माहिती घेत असताना, गुप्त बातमीदारामार्फत कृष्णानगर, घोडेगाव येथे काही इसम गोवंशीय जनावरे ट्रकमध्ये भरून कत्तलीसाठी नेत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धडक दिली असता, मातीच्या ढिगाऱ्यावरून गोवंशीय जनावरे ट्रकमध्ये भरताना चार इसम आढळून आले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – रशिद जानुभाई शेख (वय 65, रा. घोडेगाव),अमीन इसाक सय्यद (वय 30, रा. लोहगाव), लाला उर्फ आफताब हारुन शेख (वय 26, रा. घोडेगाव), शुभम बाबासाहेब पुंड (वय 26, रा. माळीचिंचोरा) आरोपींकडून 9.10 लाख रुपये किमतीची 13 गोवंशीय जनावरे तसेच 30 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक (क्र. MH-46 AR-6385) असा एकूण 39.10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी सोनई पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 32/2026 अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 (सुधारित 2015) मधील कलम 5(अ), 5(ब), 9 तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अधिनियमातील कलम 3 व 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस ठाणे करीत आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीपणे पार पाडली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!