राहाता प्रतिनिधी : ममदापुर (ता. राहाता, जि. अहिल्यानगर) येथे मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तलखाने सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या आरोपींशी आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप असलेले लोणी पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोहेकॉ/१२०३) जोसेफ सिलास साळवी यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
ममदापुर परिसरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याबाबत माहिती मिळूनही संबंधित कत्तलखान्यांवर प्रभावी कारवाई करण्यात आली नसल्याची तक्रार वरिष्ठ कार्यालयाकडे दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली असता, बाभळेश्वर पोलीस दुरक्षेत्रात कार्यरत असलेले पोहेकॉ साळवी यांनी अवैध कत्तलखान्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आवश्यक ती ठोस कारवाई न केल्याचे निष्पन्न झाले.
तसेच, मागील एक वर्षातील ममदापुर (ता. राहाता) येथील प्राणी संरक्षण अधिनियमान्वये दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला असता, या गुन्ह्यांतील आरोपींशी पोहेकॉ साळवी हे नियमित संपर्कात असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. कर्तव्यावर असताना हलगर्जीपणा करणे, शिस्तभंग करणे तसेच पोलीस खात्याची प्रतिमा जनमानसात मलीन होईल असे वर्तन केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध कत्तलखान्यांविरोधात पुढील काळात कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
गोवंशीय जनावरांच्या कत्तलप्रकरणी आरोपींशी संबंध! लोणी पोलीस ठाण्यातील पोहेकॉ जोसेफ सिलास साळवी निलंबित

0Share
Leave a reply












