राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी मुळा धरणाच्या डावा व उजवा कालवा तसेच निळवंडे धरणाच्या कालव्यातून तात्काळ आवर्तन सोडावे, अशी जोरदार मागणी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. सध्या तालुक्यात शेतकऱ्यांकडून ऊस, गहू, हरभरा व कांदा या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, दिवसा नियमित वीजपुरवठा मिळत नसल्याने आणि रात्री बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. या परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी दोन्ही धरणांतून तातडीने पाणी सोडणे अत्यावश्यक असल्याचे तनपुरे यांनी स्पष्ट केले.
मुळा धरणाच्या दोन्ही कालव्याखालील तसेच निळवंडे धरणावर अवलंबून असलेल्या जिरायत भागातील शेतीसाठी सध्या पाण्याची तीव्र गरज आहे. गहू, हरभरा, ऊस व कांदा या पिकांना निर्णायक अवस्थेत पाणी न मिळाल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुळा धरणाच्या डावा व उजवा कालवा तसेच निळवंडे धरणातून तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी त्यांनी केली.
यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कापूस, कांदा, तूर व सोयाबीन यांसारखी पिके अनेक ठिकाणी पूर्णतः वाया गेली असून, उसाला तुऱ्ये फुटल्याने वजनात घट झाली आहे. या नुकसानीतून सावरत शेतकरी पुन्हा कांदा, गहू, हरभरा आदी पिकांची लागवड करत आहेत. मात्र, आवश्यक पाणी उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन मुळा व निळवंडे धरणातून शेतीसाठी पाणी सोडावे, अशी ठाम मागणी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.
मुळा धरणाचा डावा व उजवा कालवा तसेच निळवंडे धरणाच्या कालव्यातून तात्काळ आवर्तन सोडण्याची माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची मागणी

0Share
Leave a reply












