SR 24 NEWS

क्राईम

श्रीरामपूरमध्ये चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला,  दोन जण गंभीर जखमी; आरोपींस अटक करत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर :  श्रीरामपूर शहरात चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांवर ट्रॅक्टर घालून जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना श्रीरामपूर तालुक्यातील कमलपूर येथे घडली. या हल्ल्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे हे गंभीर जखमी झाले असून, मदतीसाठी धावून आलेल्या एका नागरिकालाही दुखापत झाली आहे. या प्रकरणी लक्ष्मीकांत काळु मुंजाळ (वय २०, रा. कमलपूर) याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. 1103/2025 अन्वये टाटा कंपनीचा 709 टेम्पो चोरीस गेल्याची नोंद असून, या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाकडून सुरू होता. तपासादरम्यान २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी गुप्त बातमीदाराकडून चोरीस गेलेला मुद्देमाल संशयित आरोपी लक्ष्मीकांत मुंजाळ याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

या माहितीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल अजित अशोक पटारे व पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे यांनी कमलपूर परिसरात सापळा रचला. सकाळी साडेआठच्या सुमारास आरोपी हा निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून वाळू व दूध कॅन घेऊन दुध डेअरीकडे जात असताना पोलिसांनी त्याला थांबवून आपली ओळख सांगत चौकशीसाठी खाली उतरण्यास सांगितले. मात्र आरोपीने पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून अचानक ट्रॅक्टर सुरू केला व “मला अडवले तर ट्रॅक्टरखाली चिरडून टाकीन” अशी धमकी देत पोलिसांच्या दिशेने ट्रॅक्टर भरधाव चालवला. यामध्ये पोहेकॉ. प्रसाद साळवे यांच्या अंगावर ट्रॅक्टर गेल्याने त्यांचा उजवा हात चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाला. त्यांच्या पायासह शरीरालाही गंभीर दुखापत झाली.

या वेळी मदतीसाठी धावून आलेले बाबा इमाम सय्यद (रा. टाकळीभान) यांनाही ट्रॅक्टरचा जोरदार धक्का बसून डोके व पायाला मार लागला, त्यामुळे ते बेशुद्ध पडले. प्रसंगावधान राखत पोलीस कॉन्स्टेबल अजित पटारे यांनी झटापटीत ट्रॅक्टरवर चढून ब्रेक दाबत वाहन थांबवले व आरोपीस ताब्यात घेतले. जखमी पोहेकॉ. साळवे व नागरिक सय्यद यांना तातडीने श्रीरामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी आरोपी लक्ष्मीकांत काळु मुंजाळ याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा, पोलिसांवर हल्ला व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!