राहुरी प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरने प्रभावी कारवाई करत राहुरी पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या तीन जुगार अड्यांवर छापे टाकून पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण ७,१६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती संकलित करून त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांना दिले होते. त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि. संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार भगवान थोरात, रमीजराजा आतार व विशाल तनपुरे यांचे विशेष पथक तयार करून अवैध जुगार अड्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन देण्यात आले.
दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सदर पथकाने राहुरी पोलीस ठाणे हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे तीन ठिकाणी छापे टाकून जुगार खेळत असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या प्रकरणात गुन्हा रजिस्टर नंबर 1421/2025, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये राधेश्याम दत्तात्रय कुसमुडे, रा. राहुरी वेस, वांबोरी, ता. राहुरी याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येऊन त्याच्याकडून १,९६० रुपये जप्त करण्यात आले. दुसऱ्या प्रकरणात गुन्हा रजिस्टर नंबर 1422/2025 अंतर्गत अमोल बाळू घोरपडे, रा. मुळनमाथा, बजरंग चौक, राहुरी याला अटक करण्यात आली असून निलेश भाऊसाहेब गुंजाळ, रा. राहुरी हा आरोपी फरार आहे. या प्रकरणात २,४५० रुपये जप्त करण्यात आले.
तिसऱ्या प्रकरणात गुन्हा रजिस्टर नंबर 1423/2025 अन्वये दाऊद दादामियाँ शेख, रा. मल्हारवाडी रोड, राहुरी व संतोष जगन्नाथ वाणी, रा. काळे आखाडा, मल्हारवाडी रोड, राहुरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून २,७५० रुपये जप्त करण्यात आले.या तिन्ही कारवायांमध्ये एकूण ३ गुन्हे दाखल, ५ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून ७,१६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
राहुरीतील तीन जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे धाडसी छापे, ५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल ; ७,१६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

0Share
Leave a reply












