सोनई प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : हॉटेल चालकास मारहाण करून गळ्यातील २७ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेण्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे. या गंभीर प्रकरणात सहा आरोपींविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.
सदरील प्रकरणाची हकीगत अशी की फिर्यादी लक्ष्मण गंगाधर जगधळे (वय ३८, रा. दत्तनगर, सोनई) हे धनश्री हॉटेलवर काम करत असताना आरोपी क्रमांक १ ते ५ हे दोन मोटारसायकलवर येऊन हॉटेलच्या गळ्यातील २७,००० रुपये जबरदस्तीने घेतले. फिर्यादीने विरोध केल्यावर आरोपींनी धारदार चाकू व कत्तीने पोटावर, बरगडीजवळ आणि गळ्याजवळ वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
दरम्यान, आरोपी क्रमांक ६ हा सोनई ग्रामपंचायतीचा माजी सरपंच असून त्याने फिर्यादीला मागील काही दिवसांपासून धमक्या दिल्या होत्या. फिर्यादी समाजविषयक भाषणे करतो, म्हणून त्याचा “गेम होणारच” अशी धमकी देत आरोपी क्र. १ ते ५ यांना सुपारी देऊन कट रचल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४५५/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३११, ६१(२), ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेची कारवाई मा. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष सुचना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले. सपोनि हरीष भोये तसेच पोलीस अंमलदार सुरेश माळी, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, आकाश काळे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर व चालक चंद्रकांत कुसळकर यांनी शोधमोहीम सुरू केली.
ऑपरेशनदरम्यान पथकास आरोपी सौरभ उर्फ शेंग्या अशोक गजभिव (वय २१, रा. राजवाडा, सोनई) हा घोडेगाव शिवारातील चांदा रोड परिसरात दिसणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ सापळा लावून त्यास शिताफीने अटक केली.
चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यात इतर पाच साथीदारांची नावेही सांगितली – 2) आकाश मोहन काकडे, 3) सचिन मोहन काकडे, 4) जेकब अँन्थनी साळवे, 5) सनी किसन शिंदे, 6) दादासाहेब वैरागर (माजी सरपंच) सदरील अटक आरोपीस सोनई पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशनकडून सुरु आहे. ही कारवाई मा. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली.
Leave a reply













