SR 24 NEWS

इतर

अहिल्यानगर जिल्ह्याला थंडीच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ – प्रशासनाकडुन नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी

Spread the love

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : अहिल्यानगर जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडत आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्याचे भारतीय हवामान खात्याच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे. जिल्ह्यात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी दोन दिवस जिल्ह्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हिवाळ्यामध्ये स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे व पायमोजे तसेच शाल, चादर यांसारख्या उबदार कपड्यांचा पुरेसा वापर करावा. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी गरम पेय आणि पौष्टिक आहार घ्यावा. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ युक्त फळे आणि ताज्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. थंडीची लाट असताना शक्यतो घरातच राहावे. थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळावा. घर आणि परिसर उबदार राहील याची दक्षता घ्यावी. घरातील लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. थंडीमुळे त्यांना त्रास होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.थंडीत दीर्घकाळ राहिल्याने त्वचा निस्तेज किंवा बधीर होत असल्यास, तसेच शरीराचा थरकाप होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. हे शरीराचे तापमान कमी होण्याचे लक्षण असू शकते.

नागरिकांनी स्वतःसोबतच आपल्या पाळीव प्राण्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. जनावरांना गोठ्यात किंवा सुरक्षित ठिकाणी बांधावे आणि त्यांना थंड वाऱ्यापासून वाचविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी नजीकचे आरोग्य केंद्र, रुग्णालय किंवा ‘१०८’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!