अहिल्यानगर प्रतिनिधी (वसंत रांधवण) : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहित महिलेने पंधरा महिन्यांच्या बालकासह घरातून तेरा तोळे सोन्याचे दागिने आणि तब्बल अडीच लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची नोंद पतीने पाथर्डी पोलीस ठाण्यात केली असून संपूर्ण गावात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घराच्या मागील दरवाज्यातून मुलाला घेऊन बाहेर पडली. त्याच वेळी तिचा पती कामानिमित्त अहिल्यानगर येथे गेलेला होता. घरात सासू-सासरे समोरील खोलीत टीव्ही पाहत असल्यानं कुणालाही तिच्या हालचालींची चाहूलही लागली नाही. नंतर घरातील पडताळणी करताना कपाटातील तेरा तोळे सोन्याचे दागिने व अंदाजे अडीच लाख रुपये गायब असल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसात धाव घेतली.
दरम्यान, पोलिस तपासात महिलेची इन्स्टाग्रामवर एका युवकाशी ओळख झाल्याची माहिती समोर आली आहे. ही ओळख नेमकी कधी प्रेमसंबंधात बदलली आणि पळून जाण्याची योजना कशी आखली गेली याबाबत कुटुंबीय पूर्णत: अनभिज्ञ होते. संबंधित युवक शेजारच्या गावातील कापड दुकानात कामाला असल्याचे समजते. विशेष म्हणजे, घटनेच्या दिवशी तोही रहस्यमयरीत्या गायब झाला आहे.
या घटनेमुळे कुटुंब आर्थिक आणि मानसिक धक्क्यात सापडले असून संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. पाथर्डी पोलिसांकडून महिलेचा आणि संबंधित युवकाचा शोध घेण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून तपास जोरात सुरू आहे.
पाथर्डी येथील विवाहित महिला पंधरा महिन्यांच्या बालकासह घरातून पसार, तेरा तोळे सोन्याचे दागिने व अडीच लाख रुपयांची रोकड घेऊन शेजारील युवकासोबत पसार

0Share
Leave a reply












