अहिल्यानगर प्रतिनिधी (वसंत रांधवण) : प्रेमविवाहाला मुलीच्या आई-वडिलांचा तीव्र विरोध, त्यातून झालेला सातत्याने शारीरिक-मानसिक छळ आणि विवाहितेला पतीकडे न पाठवल्याच्या विवंचनेतून सर्जेपुरा येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अक्षय अशोक उमाप (वय 32, रा. सर्जेपुरा, अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी अक्षयची बहीण आकांक्षा शरद पवार (वय 30, रा. पिंपळगाव माळवी, ता. अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून सुनील मंडलिक व ज्योती सुनील मंडलिक (दोघे रा. देवसडे, कुकाणा, ता. नेवासा) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
अक्षय उमाप आणि प्रेरणा मंडलिक (सासरी – प्रेरणा अक्षय उमाप) यांचा पुण्यात प्रेमविवाह झाला होता. मात्र, मुलीच्या आई-वडिलांनी या विवाहास तीव्र विरोध केल्याने ते लग्नास उपस्थितही राहिले नव्हते. लग्नानंतर अक्षय-प्रेरणा हे दाम्पत्य सर्जेपुरा येथे एकत्र नांदत होते.
दरम्यान, दिवाळीच्या भाऊबीजेसाठी ऑक्टोबरमध्ये आकांक्षा पवार यांनी अक्षय आणि प्रेरणाला पिंपळगाव माळवी येथे बोलावले होते. त्याच दिवशी सायंकाळी प्रेरणाचे आई-वडील तेथे आले. पहिली दिवाळी असल्याचे कारण देत त्यांनी प्रेरणाला दोन दिवसांसाठी माहेरी सोबत नेले, परंतु त्यानंतर तिला पुन्हा पतीकडे नांदायला पाठवले नाही.
अक्षय आणि त्याची बहीण यांनी वारंवार फोन करून विचारणा केली असता, “तिचे दुसरे लग्न जमवले आहे, फोन करू नका” अशा धमक्या देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या सततच्या छळामुळे अक्षय नैराश्यात गेल्याने अखेर त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
अहिल्यानगरमध्ये प्रेमविवाहाला मुलीच्या आई-वडिलांचा तीव्र विरोध – विवाहितेला नांदायला न पाठविल्याने तरुणाची आत्महत्या

0Share
Leave a reply












