श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : श्रीरामपूर तालुक्यातील कडीत येथील शेतकरी कुटुंबातील कन्या प्राजक्ता सोपान वडीतके हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग यश मिळवत राज्य कर निरीक्षक या पदासाठी पात्रता मिळवून गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. प्राजक्ताच्या या उल्लेखनीय यशामुळे कडीत व परिसरात आनंदाचे वातावरण असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्राजक्ता ही श्रीरामपूर तालुक्यातील गळलिंब येथील प्रगतशील शेतकरी सोपान किसन वडीतके यांची कन्या आहे. प्राथमिक ते दहावीपर्यंतचे शिक्षण नारायणगाव येथे पूर्ण करून तिने अकरावी-बारावीचे शिक्षण पुण्यात घेतले. त्यानंतर तिने कृषी शाखेची पदवी के.के. वाघ कॉलेज, नाशिक येथे पूर्ण केली. दोन वर्षे सातत्याने कठोर परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तिने MPSC परीक्षेत प्रथमच प्रयत्नात राज्य कर निरीक्षकपदी आपले स्थान पक्के केले.
प्राजक्ता ही कडीत येथील सखाहरी मोघाजी वडीतके व रामभाऊ यशवंत वडीतके यांची नात असून प्राध्यापक संजय सखाहरी वडीतके यांची पुतणी आहे. शेतकरी कुटुंबातून येऊनही स्पर्धा परीक्षेत केलेली तिची कर्तबगारी सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.तिच्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी कडीत येथील धुंदगिरी महाराज सभामंडपामध्ये भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रवरा बँकेचे संचालक भाऊसाहेब वडीतके, यशवंत नागरी पतसंस्थेचे संचालक रामदास वडीतके, यशवंत सेना जिल्हा संपर्कप्रमुख रंगनाथ अण्णा तमनर, प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच ज्योतीताई शिंदे, सरपंच ज्ञानेश्वर वडीतके, डॉ. वीरेश पारखे, युनिक कॉम्प्युटरचे संचालक श्री. कोळपे, जानकूबाई वडीतके, ईश्वर होन, रावसाहेब वडीतके, डॉ. दीपक काळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी प्राजक्ताचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्राजक्ताने आपल्या यशात आई-वडिलांचा त्याग, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमासाठी उपसरपंच प्रकाश होन, दादा पाटील होन, दत्तात्रय चोथे, आबासाहेब वडीतके, राजेंद्र वडीतके, कामगार पोलीस पाटील भाऊसाहेब वडीतके, विठ्ठल गागरे, शिवाजी वडीतके, पांडुरंग शिंदे, डॉ. विठ्ठल खेमनर, सागर वडीतके, किरण मार्कड, तसेच महिला वर्गातून मीरा चोथे, मोहिनी सोनवणे, संगीता खेमनर, सुनीता वडीतके, सुजाता वडीतके, सविता वडीतके यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक संजय वडीतके, आयुष्य वडीतके, आर्यन वडीतके, राहुल खेमनर, राहुल सोपान वडीतके, देवा राजेंद्र वडीतके, महेश वडीतके, रवींद्र वडीतके यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रंगनाथ अण्णा तमनर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दीपक काळे यांनी केले.
कडीतचा अभिमान! शेतकरी कन्या प्राजक्ता वडीतके पहिल्या प्रयत्नात राज्य कर निरीक्षकपदी निवड

0Share
Leave a reply












