SR 24 NEWS

इतर

संगमनेर हादरले! मुळा नदीच्या पात्रात आढळला पाच महिन्याच्या अज्ञात बालकाचा मृतदेह

Spread the love

संगमनेर प्रतिनिधी (गंगासागर पोकळे) : मानवतेला काळीमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना संगमनेर तालुक्यात गुरुवारी (दि. ०४) सकाळी उघडकीस आली. घारगाव परिसरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या पात्रात अंदाजे तीन ते पाच महिन्यांच्या अज्ञात बालकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना सकाळी सुमारे ७ वाजता उघडकीस आली असून, या बाबत घारगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक–पुणे महामार्गालगत असलेल्या घारगाव भागात ग्रामस्थ पहाटेच्या सुमारास नदीकाठी गेले असता त्यांना नदीपात्रात एक लहान बाळ दिसून आले. बाळात कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून त्यांनी तात्काळ घारगाव पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ गांधले, पोलिस हेड कॉन्स्टेबल रामभाऊ भुतांबरे, राजेंद्र कोरडे, विलास कोकाटे, महादेव हांडे, रोहिदास आंधळे व चालक दत्ता आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बाळाला तातडीने दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. संध्याकाळपर्यंत बाळाची ओळख पटविणे शक्य झाले नव्हते. बाळाच्या मानेवर काही जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. या संतापजनक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिस विविध दिशांनी तपास सुरू करत आहेत. घटना नेमकी कशी घडली याबाबत अजूनही अनिश्‍चितता आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!