राहुरी फॅक्टरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील अक्षय तात्याराम गीते याने कठोर मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर भारतीय सैन्यदलात आपले स्थान पक्के केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सैन्य भरती परीक्षेच्या निकालात मैदानी आणि लेखी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत त्याने सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न साकार केले. अक्षयच्या निवडीची बातमी गावात पोहोचताच चिंचविहिरे आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तरुणाच्या या यशाचा गावकऱ्यांसह तालुकाभरातून मोठ्या उत्साहात गौरव केला जात आहे.
अक्षयने कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्ममालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केले. या काळात मेजर साईनाथ वर्पे, मेजर प्रवीण पठारे, मेजर हेमाकांत पाटील, मेजर चेतन गिरमे, मेजर सुधीर नाकाडे तसेच गंगाधर खाटेकर आणि उर्मिला खाटेकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य त्याला लाभले.
अक्षय गीतेच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, गावाने आणखी एका जवानाचा मान मिळवला आहे.
Leave a reply













